गुलकंदाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि खडीसाखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार करू शकतो.
गुलाबशेती करणाऱ्यांसाठी; तसेच महिला बचत गटांसाठीही गुलकंदनिर्मिती हा चांगला जोडधंदा आहे. गुलाब फुलांचा उपयोग हार बनविण्यासाठी होतोच, त्याच बरोबरीने गुलकंद, गुलाबपाणी, अत्तर, गुलाब तेल, उदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. याचबरोबरीने एव्हान, क्रिमझन ग्लोरी हार्ट थ्रॉब, ब्ल्यू मून, मॉन्टेझुमा, हैद्राबादी गुलाब या सुवासिक फुलांच्या जाती आहेत.
गुलकंद करण्याची कृती
साहित्य १. गुलाब पाकळ्या, २. खडी साखर, ३. प्रवाळ पिष्ठी
प्रक्रिया
१. गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. म्हणजे गुलकंदाला रंग व सुगंध चांगला येतो. देशी गुलाबांना जेवढा सुगंध असतो, त्या प्रमाणात विदेशी गुलाबांना नसतो.
२. प्रथम पूर्ण उमललेल्या निरोगी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात. पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत. एक किलो खडी साखर (1ः1) या प्रमाणात एक थर पाकळ्या आणि एक थर खडी साखर असे काचेच्या बरणीत भरावे.
३. काचेची बरणी उन्हात 4 ते 5 दिवस ठेवावी. उन्हामुळे साखरेचे पाणी होते. आणि त्यात या पाकळ्या मुरतात. असा चविष्ट गुलकंद 21 ते 25 दिवसांत खाण्यासाठी तयार होतो.
गुलकंदाचे फायदे
१. एक उत्तम पाचक आहे. उष्णतेपासून होणारे विकार, ताप, रक्तपित्त, कांजिण्या, शारीरिक दौर्बल्यावर उपचारासाठी गुलकंदाचा चांगला उपयोग होतो.
२. गुलकंद कांतिदायक तृष्णाशामक आहे.
३. गुलकंदामध्ये 10 टक्के प्रवाळ मिसळून वाढत्या वयाची मुले आणि शारीरिक दौर्बल्य असलेल्यांना दिल्यास ते शक्तिवर्धक म्हणून काम करते.
पॅकिंग & मार्केटिंग
१. पॅकिंग साठी चांगल्या गुणवत्तेची प्लास्टिक डबी/बॉटल चालू शकते. काही मोठे ब्रँड्स काचेच्या बॉटल मध्ये सुद्धा पॅकिंग करतात
२. बॉटल वर लावण्यासाठी लेबल तयार करून घ्यावे
३. चांगलं ब्रँडनेम, लोगो असल्यास उत्तम.
४. आपल्या वैयक्तिक संपर्कात लगेच विक्री सुरु करता येऊ शकते.
५. आसपासच्या किराणा दुकानात, मेडिकल मध्ये, बेकारी शॉप्स मध्ये गुलकंद ची विक्री चांगली होऊ शकते.
व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान रु. १५ हजार आवश्यक आहे
धन्यवाद
स्रोत – विकासपीडिया
संकलन – कृषीराज्य