स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे फळ लाल रंगाचे असून ते थंड प्रदेशात चांगले येते. स्ट्रॉबेरी ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या फळाचा उगम प्राचीन रोम मध्ये झाला असे मानले जाते. सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात. नंतर जसजशी त्यांची वाढ होत जाते तसतशा त्या लाल होत जातात. स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे तीन हंगामांत करता येते. परंतु महाराष्ट्रातील ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत तील हवामान स्ट्रॉबेरी फळासाठी पोषक आहे. या लेखात आपण स्ट्रॉबेरी फळापासून तयार करण्यात येणारे प्रक्रियायुक्त पदार्थांविषयी माहिती घेणार आहोत.
स्ट्रॉबेरी फळापासून तयार केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ
स्ट्रॉबेरी सिरप :
स्ट्रॉबेरी सिरप तयार करण्यासाठी रस 30 टक्के, साखर 60 टक्के व सायट्रिक आम्ल दीड टक्के लागते. लाल रंगाची पिकलेली निवडून स्ट्रॉबेरी घ्यावी. त्यानंतर ती स्वच्छ धुऊन स्ट्रॉबेरी तील बी कॉरकर च्या साह्याने काढून स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून घ्यावे. स्टीलच्या पातेल्यात वरील प्रमाणी करणानुसार एक लिटर रस घेऊन त्यामध्ये 750 ग्रॅम साखर,5.5 ग्रॅम सायट्रिक आम्ल,0.5 लिटर पाणी मिसळून ते मिश्रण गरम करावे. त्या मिश्रणाचा ब्रिक्स 65 ते 68 अंश आला की सिरप तयार झाला असे समजावे. ग्लासमध्ये थोडे सिरप घेऊन त्यात 0.6 ग्रॅम सोडियम बेंजोएट विरघळून घ्यावे व ते सीरप मध्ये टाकावे. तयार झालेला सिरप निर्जंतुक करून बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावे.
स्ट्रॉबेरी जॅम :
यासाठी पूर्ण पिकलेली स्ट्रॉबेरी घ्यावी व त्यातील गर काढून घ्यावा. एक किलो गरात एक किलो साखर, चार ग्रॅम सायट्रिक ऍसिड, चार ग्रॅम पेक्टीन व खाद्य रंग टाकावे. नंतर हे मिश्रण स्टीलच्या पातेल्यात 103 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावे. हे मिश्रण शिजवताना फळीने सतत हलवावे. म्हणजे गर करपत नाही व जॅम चांगल्या प्रतीचा तयार होतो. मिश्रणाचा ब्रिक्स 68 टक्के आल्यास जॅम तयार झाला असे समजावे.या तयार झालेला जॅम कोरड्या व निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये हवाबंद करून ठेवावे.
स्ट्रॉबेरी हलवा :
लाल रंगाची पिकलेली स्ट्रॉबेरी निवडून स्वच्छ धुऊन घ्यावी. नंतर स्ट्रॉबेरी तील बी काढून स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून त्यातील गर काढून घ्यावा. कढईत 250 ग्रॅम तूप गरम करावे आणि तूप गरम झाल्यावर त्यात 250 ग्रॅम रवा घाला. दहा मिनिटे मंद आचेवर मिश्रण भाजून त्यात दीडशे मिली दूध घाला आणि मिश्रण दोन मिनिटे झाकून ठेवावे. दोन मिनिटानंतर मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. तयार झालेला मिश्रणामध्ये 50 ग्रॅम साखर आणि 500 ग्रॅम स्ट्रॉबेरीची प्युरी घाला, नंतर मिश्रण चांगले मिक्स करावे आणि नंतर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शिजवावे. तयार झालेला स्ट्रॉबेरी हलवा सर्विंग भांड्यात गरम गरम सर्व्ह करावा.
स्ट्रॉबेरी आईस्क्रीम :
यासाठी पिकलेली स्ट्रॉबेरी घेऊन त्यातील गर काढून घ्यावा. 500 ग्राम गर गाळून घ्यावा. 700 ग्रॅम दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा. दह्यात 250 ग्रॅम पिठी साखर, 60 ग्रॅम दुधाचे पावडर, दोन ग्रॅम लिंबाचा रस व 25 ग्रॅम क्रीम घालून मिश्रणाला पाच मिनिटे फेटून घ्या. नंतर फेटलेले मिश्रण फ्रिजमध्ये दोन तास सेट होण्यास ठेवावे. दोन तासांनी अर्धवट झालेली आईस्क्रीम बाहेर काढा व मिक्सर मध्ये फिरवून घ्या. पुन्हा मिश्रण फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यात सात तास सेट होण्यास ठेवा. तयार झालेल्या आईस्क्रीम व स्ट्रॉबेरीचे सजावट करा.
स्ट्रॉबेरी बार :
पिकलेली चांगली निरोगी फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. फळांची बी काढून बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात व त्यातील गर काढून घ्या मिक्सरमधून काढलेला गर मसलिन कापडा मधून गाळून घ्यावा. एक किलो गरामध्ये दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर व पाच ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवावे. शिजवलेले मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून एकसमान पसरून वाळविण्यासाठी तीन ते चार तास ठेवावे. नंतर मिश्रणाची पापडी उलथवावी व पुन्हा दोन ते तीन तास सुकवावे. नंतर तयार झालेला स्ट्रॉबेरी बार चे योग्य आकाराचे तुकडे करून बटर पेपर मध्ये आकर्षक पॅकिंग करावी व साठवणूक थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
संकलन : कृषीराज्य