Menu Close

दुधातील फॅट वाढविण्यासाठी हे उपाय करा

दुधामध्ये पाणी, स्निग्धांश (फॅट), प्रथिने, शर्करा, खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे हे वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाचा स्वाद हासुद्धा बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशावर अवलंबून असतो. दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी व त्यांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी दुधातील स्निग्धांशास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • आपल्याकडे होलस्टीन फ्रिजीयन संकरित गाई असल्यास त्यांच्या पुढील पिढ्या जर्सी जातीच्या रेतमात्रा वापरून तयार कराव्यात. म्हणजे दूध उत्पादनाबरोबर दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढेल. जर्सी संकरित गाईंच्या दुधात स्निग्धांशांचे प्रमाण जास्त असल्याने दर दहा गाईंत तीन यानुसार संगोपनास गाई ठेवल्यास एकत्रित दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सामान्य प्रमाणात ठेवता येईल. कृत्रिम रेतन पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.
  • म्हशींच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सात टक्‍क्‍यांच्या वर असल्याने अधिक स्निग्धांशासाठी म्हशी पाळाव्यात.
  • जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा, तसेच उसाच्या वाढ्यांचा वापर टाळावा. उसाचे वाढे, भाताचा पेंढा, गव्हाचे काड असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश कमी होते. या चाऱ्याचे पोषणमूल्य मळी, खनिज मिश्रण आणि मीठ वापरून वाढविता येते, त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
  • गाई- म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मका भरडा, तूर, हरभरा, मूग चुनी, भात- गव्हाचा कोंडा इ. योग्य प्रमाणात द्यावा. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
  • जनावरांच्या दैनंदिन आहारात 25 ते 30 ग्रॅम क्षार मिश्रणाचा वापर करावा. क्षार चाटण विटा गोठ्यात बांधाव्यात. तसेच, आहारात जीवनसत्त्वांचा देखील वापर करावा.
  • दूध दोहनातील अंतर समान असावे (जर सकाळी सहा वाजता दूध काढले, तर सायंकाळी सहा वाजता दूध काढावे). अंतर वाढले तर दूध वाढते, पण फॅट कमी होतात.
  • दूध काढताना कास चांगली घुसळून धुवावी, म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणात देखील वाढ होईल. गाईचे दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
  • गोठा आणि जनावरे स्वच्छ ठेवावीत, जेणेकरून कासदाहसारखे आजार दुधाळ जनावरांना होणार नाहीत. तसेच, कासदाह झाल्यास त्वरित उपचार करावेत.
  • दुधाळ जनावरांना शक्‍य असल्यास मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. व्यायाम झाल्यामुळे गाईंच्या दूध उत्पादनात व फॅटच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे.
  • जास्त वयस्क गाई, म्हणजेच सातव्या विताच्या पुढे गोठ्यात ठेवू नयेत.

संपर्क : महेंद्र मोटे,
विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे
लेखक -सुनील पाटील, चिखले, जि. ठाणे

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

Posted in शेती सल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *